मुंबई: राज्यात शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समसमान कार्यक्रमानुसार सत्ता स्थापन केली. मात्र महाविकास आघाडीच्या तीन चाकी रिक्षामध्ये काँग्रेसने अडथळ्यांचा डोंगर उभा केला आहे. काँग्रेसने शिवसेनेला डिवचण्यासाठी माजी खासदार संजय निरुपम यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यात शिवसेना भाजपचं सरकार असताना शिवसेनेची भूमिका नेहमी भाजपच्या विरोधात असायची शिवसेनेचे मंत्री,आमदार हे विरोधकासारखे वागत होते. पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये शिवसेनेने विरोधी भूमिका बजावली होती. आता मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असून तीच रि काँग्रेसकडून ओढली जात आहे. विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम हे शिवसेना,शिवसेनेचे पक्षप्रमुख,मुख्यमंत्री यांच्या कारभारावर ते थेट हल्ला करतात.
शिवसेनेसोबत काँग्रेसने सत्ता स्थापन करु नये यासाठी काँग्रेसमधून सुरुवातील सर्वप्रथम संजय निरुपम यांनी विरोध दर्शविला होता. वरिष्ठांकडे आपली भूमिका मांडली होती. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये महत्वाची भूमिका बजावल्यामुळे उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान होता आलं. तरीसुध्दा त्यांच्या कारभारावर अंकुश राहावा यासाठी संजय निरुपम वारंवार हल्लाबोल करत असताना दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत, रामदास कदम, अनिल परब, निलम गो-हे, सुनिल प्रभू हे नेते आता शिवसेनेविरोधात कुणी भूमिका घेतली तर त्याला प्रतिउत्तर देत होते. परंतु आता संजय निरुपम शिवसेनेवर जाहीर पणे टीका करतात तरी सुध्दा शिवसेनेकडून कोणताही प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही. सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेच्या या सर्व प्रवक्त्यांना शांत राहण्याचे आदेश तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
हेही वाचा: कोविड केअर सेंटरमध्ये महिलेवर अतिप्रसंग; सभागृहात गदारोळ, उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर भाजपकडून सवाल उपस्थित केल्यानंतर शिवसेनेला आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे रोखठोकपणे मांडावे लागते. त्याचवेळी काँग्रेसकडून निरुपम हे शिवसेनेवर टीका करतात. त्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. काँग्रेसच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या विरोधात काही विधान केलं तर महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडेल आणि उध्दव ठाकरेंचं सरकार कोसळेल या भितीने शिवसेनेचे सर्व नेते सायलेंट मोडवर आहेत. असेच सध्याचे चित्र आहे.
संजय निरुपम माजी खासदार असून हिंदीभाषिक नेते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांच्याविरुध्द कोणतीही भूमिका घेत नाही. कारण संजय निरुपम यांना दिल्लीश्वरांचे आशीर्वाद असल्यामुळे ते शिवसेनेशी थेट सामना करतात असेच सध्याचे चित्र पाहायाला मिळत आहे.
उध्दव ठाकरे यांना सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसकडून होणा-या विरोधाकडे दुर्लक्ष करुन सरकार चालवायचे आहे. या सर्व परिस्थितीतून एकच संदेश जनतेमध्ये जातो तो म्हणजे शिवसेनेच्या चूकीच्या भूमिकांना काँग्रेसमधून विरोध होतो. एवढे मात्र निश्चित.