सातारा : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून परमबीर सिंगांवर पलटवार केला जात आहे. परमबीर सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी परमबीर सिंगांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुध्द परमबीस सिंग असा सामना रंगणार आहे.
“माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली ही त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर केली. तरीदेखील परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली आहे. यामागे कुणाचा हात आहे हे सर्वज्ञात आहे. दिल्लीला गेल्यानंतर एवढा बदल कसा होतो” असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. त्या अधिकाऱ्याची प्रॉपर्टी किती आहे याची चौकशी करावी, अशी मागणी शिंदे यांनी राज्य सरकारला केली आहे.
राज्य सरकारला माझी विनंती आहे की..
राज्य सरकारला माझी विनंती आहे की या IPS अधिकाऱ्याची किती प्रॉपर्टी आहे याचा शोध घ्यावा. अधिकारी प्रामाणिक काम करत होते की नाही हे महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या. अनेक ठिकाणी अनेक प्रॉपर्टी आहेत असं कळतंय, त्याची चौकशी व्हावी. राज्य सरकारने अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घालू नये. दबक्या आवाजात जी चर्चा आहे, असे अधिकारी का बदलले हे जनतेला कळू द्या, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस देशमुखांच्या पाठिशी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे. कारण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड करताना, शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे.
त्यासाठी त्यांनी परमबीर सिंगांच्या पत्राचा दाखला दिला. पवार म्हणाले, ज्या कालावधीचा उल्लेख करुन परमबीर सिंगांनी भेटीचा उल्लेख केला, त्या कालावधीत अनिल देशमुख हे कोरोनावरील उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे परमबीर सिंगांच्या आरोपात काही तथ्य नाही असं शरद पवार म्हणाले.